मुंबई - मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच अशा घटना घडत असतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मध्य मुंबईतील अशा सर्व इमारतींचा पुनर्विकास करावा यासाठी आम्ही केंद्राकडे बीपीटीची जमीन मागणार आहोत. जर त्या जमिनीची मागणी पूर्ण झाली तर त्या ठिकाणी ट्रांजिस्ट कॅम्प बांधून सर्व इमारतींचा विकास करू, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.
डोंगरी भागातील केसरबाग इमारत दुर्घटना ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. यामध्ये किमान चाळीस लोक दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. याची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असल्याचेही विखे-पाटील म्हणाले. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कायम आपली भूमिका निभावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण-मध्य मुंबईतील इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेणार असून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे विखे पाटील म्हणाले.
डोंगरी परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रांजिस्ट कॅम्प नसल्यामुळे येथील इमारतींच्या पुनर्विकासाचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही बीपीटीची 50 एकरहून अधिक एकर जागा केंद्र सरकारकडे मागत आहोत. त्यामुळे यातील सर्व प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
येथील इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर येत असतात. अनेकदा येथील रहिवासी दुसरीकडे जाण्यासाठी तयार नसतात. हा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे ज्या बिल्डरांना यासाठीचे काम दिलेले असतात त्यांच्यावर विश्वास नसतो. यातून अनेक वाद निर्माण होतात आणि पुनर्विकासाचे काम रखडले जातात. परंतु, कुठेतरी हे सर्व थांबून ज्या लोकांचा बळी जातो त्यासाठी एक धोरण ठरवावे लागेल. त्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.