मुंबई - शासनाने घोषीत केलेल्या नियमानुसार मिळणारे अनुदान शासनाने शिक्षकांच्या खात्यात तात्काळ जमा करावे, या मागणीसाठी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदान शाळेतील शिक्षकांनी गेल्या 22 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने शिक्षकांची आंदोलनस्थळी भेट घेतली. येत्या चार ते पाच दिवसात शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वसन नीलम गोऱ्हे यांनी शिक्षकांना दिले आहे.
शिक्षकांची समस्या प्रवीण दरेकर यांनी मांडली -
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी सकाळी आझाद मैदानावर भेट दिली. शिक्षकांचे हाल मांडणाऱ्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, जेव्हापर्यत विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळातील शिक्षकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजप शिक्षकांच्या पाठीशी उभी आहे, असे आश्वासन दिले. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेच्या शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत सरकारची बाजू मांडण्यासाठी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि नीलम गोऱ्हे यांनी शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांना आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - सलग 9 तास समुद्रात पोहत 12 वर्षीय मुलीने रचला विक्रम
राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक-
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. येत्या तीन ते चार दिवसात राज्य सरकारकडून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. तसेच राज्यातील विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांना शासनाने घोषित केलेल्या 20 टक्के आणि 40 टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे आश्वासन नीलम गोरे यांनी शिक्षकांना दिले आहे.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान