मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्याकरिता आणि लोकल प्रवासात सर्वसामान्य प्रवाशांकडून कोविड नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी रेल्वे स्थानकांवर क्लीन मार्शल पथकांची नियुक्ती केली आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवासी सोडा, चक्क सरकारी कर्मचाऱ्यांकडून कोविड नियमाचे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक कबुली स्वतः स्थानकांवरील क्लीन मार्शलने ईटीव्ही भारताला दिली आहे.
शासकीय कर्मचार्यांकडून मास्कला तिलांजली
सर्वसामान्य प्रवाशांना 1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तेव्हापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोविड नियमाचे पालन करा असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. कोविड नियमांच्या कठोर अंमलबजावणीकरिता रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या लोकल डब्यात क्लीन मार्शलचे पथक नेमले आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांबरोबर शासकीय कर्मचारी विना मास्क प्रवास करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केल्यास शासकीय ओळखपत्र दाखवून क्लीन मार्शलबरोबर भांडणे करत असल्याने सर्वसामन्य प्रवाशांपेक्षा शासकीत कर्मचारी हे क्लीन मार्शलसाठी डोके दुःखी ठरल असल्याचे समोर आले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना होत नाही का ?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यरत असलेल्या क्लीन मार्शल आरती बागुल यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, विना मास्क लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आम्हाला आदेश आहेत. त्यानुसार आम्ही गेल्या काही दिवसांपासून कारवाई करत आहोत. मात्र सर्वसामान्य प्रवाशांपेक्षा, मंत्रालय, मुंबई महापालिका, पोलीस, रेल्वे यांच्यासोबत इतर शासकीय कर्मचारी विना मास्क प्रवास करत आहेत. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास शासकीय ओळखपत्र दाखवून आम्हाला सोडण्याची विनंती करता, पण त्यांच्यावर कारवाई केल्यास आमच्याशी वाद घालतात. त्यामुळे शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करावे.
मास्क न घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा
रेल्वे स्थानकांवर तैनात असलेले पोलीस सुद्धा मास्क नाका खाली घालतात, तसेच काही तर पोलीस विना मास्क फिरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आम्ही पालन करतो, मात्र शासकीय कर्मचारी आणि रेल्वेस्थानकावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांसारखे कोविड नियमाचे पालन करावे, ही आमची अपेक्षा आहे. मात्र आज स्वतः पोलीसच विना मास्क फिरतात, त्यांच्यावर मार्शलकडून कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे.