मुंबई - दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची अचानक भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ राज्यातील विषयावरच चर्चा झाल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.
सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास चाललेल्या भेटीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केला. राज्यपालांनी पवार साहेबांना चहासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे आज ही भेट ठरली होती. ही भेट चांगली झाली असून अनेक चांगल्या विषयावर चर्चा झाली.
राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल बनल्यानंतर त्यांची शरद पवार यांच्यासोबत एकदाही भेट झाली नव्हती. त्यामुळे आज ही भेट झाली. परंतु या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ राज्यातील विषयावरच चर्चा झाल्याचेही पटेल यांनी यावेळी सांगितले. शरद पवार यांची ही सदिच्छा भेट असली, तरी राज्यात येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांची अशीच सदिच्छा भेट घेतली होती.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सदिच्छा भेटीत नेमके काय घडले आहे, हे अद्याप बाहेर आले नसले तरी राज्यात वेगळ्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली भयंकर परिस्थिती त्यावर काय करता येईल, यासाठीची माहिती जाणकार म्हणून शरद पवार यांच्याकडून राज्यपालांनी घेतली असावी, असेही बोलले जात आहे.