मुंबई - कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत आहे. विष्णूमध्ये झालेला हा बदल आणि त्याचा प्रसार किती प्रमाणात झाला, याची माहिती पुण्याच्या नॅशनल इस्न्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एनआयव्ही प्रयोगशाळेतील जिनोमिक सिक्वेनसिंग चाचण्यांच्या अहवालातून समोर येते. मात्र हे अहवाल यायला उशीर लागत असल्याने मुंबईत या चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात या चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
अहवाल येण्यास होतो उशीर -
भारतात गेले वर्षभराहून अधिक काळ कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सुरु असतानाच या विषाणूने आपल्यात बदल घडवून आणले आहेत. विषाणूमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती पुण्याच्या एनआयव्ही या संस्थेमधील चाचण्यांमधून समोर येते. या प्रयोगशाळेत मुंबईमधून आठवड्याला ५० सॅम्पल पाठवले जातात. पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये देशभरातून सॅम्पल येत असल्याने अहवाल यायला उशीर लागतो. दीड ते दोन महिन्याच्या कालावधीने अहवाल येत असल्याने तो पर्यंत रुग्ण बरा झाला असतो. तसेच विषाणूचा प्रसार किती प्रमाणात झाला याची माहिती मिळण्यास उशीर होतो.
कस्तुरबा रुग्णालयात लॅब -
पुण्याच्या एनआयव्हीकडून अहवाल येण्यास उशीर होत असल्याने पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोमिक सिक्वेनसिंग करण्यासाठी प्रयोगशाळा सुरु केली जाणार आहे. याआधी याच प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यात आता जिनोमिक सिक्वेनसिंग चाचण्या केल्या जातील. असे केल्याने दीड ते दोन महिने अहवाल येण्यास लागणारा कालावधी कमी होऊन तीन दिवसात अहवाल येईल. तीन दिवसात अहवाल आल्याने त्वरित उपचार करणे आणि उपाययोजना करणे शक्य होणार आहे अशी माहिती काकाणी यांनी दिली. जिनोमिक सिक्वेनसिंग करणारी यंत्रे येताच लवकरच या चाचण्या सुरु करू असे काकाणी यांनी दिली.
काय आहे जिनोमिक सिक्वेनसिंग -
मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी विविध विभागातील ५० रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवले जातात. या सॅम्पलचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालामधून विषाणूमध्ये बदल झाला आहे का ? म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का, याची माहिती मिळते. त्यावरून उपाययोजना करण्यात येतात, अशी माहिती मुंबई महापालिकेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
रिपोर्टसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी -
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दर आठवड्याला ५० रुग्णांचे सॅम्पल जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्हीकडे पाठवले जातात. यामधून त्या जिल्ह्यात किंवा त्या शहरात कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत याची माहिती समोर येते. हा रिपोर्ट सुमारे एक ते दीड महिन्यांनी संबंधित सरकारी यंत्रणांना सादर केला जातो. हा रिपोर्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही सादर केला जातो.