मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Mumbai) झाली आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णही आढळून (Omicron Cases Hike) येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या (Genome Sequencing Test) केल्या जात आहेत. या चाचण्यांच्या सातव्या फेरीत मुंबईमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ (Delta Variant) चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) ५५ टक्के रुग्ण असल्याचा अहवाल समोर आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिनोम सिक्वेसिंग चाचण्या -
मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. या लाटा थोपवल्या असल्या तरी डिसेंबर पासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णातही वाढ झाली आहे. मुंबईत कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या विषाणूचा किती प्रसार झाला आहे याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या जात आहेत.
५५ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण -
पालिकेने या आधी सहा वेळा जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या आहेत. सातव्या फेरीत ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८२ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८२ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात आले आहेत. त्यानुसार २८२ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ३७ रुग्ण (१३ टक्के), डेल्टा डेरिव्हेटीव्ह - ८९ रुग्ण (३२ टक्के) तर ओमायक्रॉनचे १५६ रुग्ण (५५ टक्के) रुग्ण आढळून आले आहेत. २८२ पैकी फक्त १७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ओमायक्रॉन बाधित १५६ पैकी केवळ ९ जणांना रुग्णालयीन उपचारांची गरज भासली. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत, त्यांना ऑक्सिजन पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही. असे असले तरी, नागरिकांनी गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे असे पालिकेने म्हटले आहे. तर नमुने संकलित केलेल्यांपैकी डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही डोस घेतलेले १० जण रुग्णालयात -
२८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल करावे लागले. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे १० जण रुग्णालयात दाखल झाले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ८१ पैकी चार जण रुग्णालयात दाखल झाले. डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती ही ६० वर्षेपेक्षा अधिक वयाची ज्येष्ठ नागरिक होती. त्यांना मधुमेह व अतिदाबाचाही त्रास होता. तसेच त्यांनी कोविड लसीचा फक्त पहिला डोस घेतला होता.
२१ ते ४० वयोगटातील ३५ टक्के रुग्ण -
चाचण्या करण्यात आलेल्या २८२ रुग्णांपैकी ० ते २० वर्षे वयोगटातील ४६ रुग्ण (१६ टक्के), २१ ते ४० वर्षे वयोगट ९ रुग्ण (३५ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगट - ७९ रूग्ण (२८ टक्के), ६१ ते ८० वयोगट - ५४ रुग्ण (१९ टक्के) तर ८१ ते १०० वयोगट - ४ रुग्ण (१ टक्के) रुग्ण आहेत.
लहान मुलांनाही बाधा -
२८२ पैकी वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये ३२ रुग्ण आहेत. त्यापैकी ४ जणांना डेल्टा व्हेरिअंटची बाधा, १२ जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्हची लागण तर १६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली.
नियमांचे पालन करा -
कोविड विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसल्याने, नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. सर्वांनी मास्कचा उपयोग करावा, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन कठोरपणे करावे तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.