मुंबई - सायन रुग्णालय परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास खड्डा खोदताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटून गॅस गळती सुरू झाली. मात्र महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या रक्षकांनी तात्काळ पालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबतील माहिती पुरवली. यामुळे ही गळती थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.
कुठे झाली गॅस गळती?
सायन रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांची इमारत आहे. लिफ्टची आर्थिंग वायर टाकण्यासाठी खड्डा खणण्यात येत होता. त्यावेळी महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली. गॅसचा वास येत असल्याची माहिती रुग्णालयात तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांनी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना दिली. पालिकेच्य सुरक्षा रक्षकांनी गॅस गळतीची माहिती मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, महानगर गॅस आदी यंत्रणांना दिली. वेळेत याचे निदान झाल्याने मोठा अनर्थ टळला.
सुटकेचा निःश्वास
सुरक्षा रक्षकांनी पाईपलाईनचा वॉल्व्ह बंद करून गळती थांबवली. अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी गॅस गळती बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अवघ्या अर्ध्या तासातच ही गॅस गळती रोखण्यात यश आल्याने सायन रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.