मुंबई - गणेशोत्सवाची धूम राज्यभरातच नाही तर देशभरात देखील सुरू आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येते. यासाठी खास घाटकोपर येथील एका मूर्ती शाळेतून मूर्ती मागवण्यात येते. येथील एक गणेश मूर्ती महाराष्ट्र सदनमध्ये स्थापना करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाली आहे. यावेळी अधिकारी देखील उपस्थित होते. दरवर्षी उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे अधिकारी नयनमोहन भाटिया यांनी सांगितले. त्यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी बातचीत केली आहे.
'गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा'
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार आहे. कमी लोकांना आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही भाटिया यांनी यावेळी सांगितले.
'सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन यावर्षी नाही'
गणेशोत्सव काळात याठिकाणी सांस्कृतीक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे आयोजन यावर्षी नसणार आहे.
हेही वाचा - बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती; पंचांगकर्ते ओंकार दातेंनी सांगितला मुहूर्त