मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सर्वाधिक असल्याने कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या कंटेन्मेंट झोनमधील गणेश मूर्तींचे विसर्जन कंटेन्मेंट झोनबाहेर आणून करता येणार नाही. अशा ठिकाणच्या मंडळांनी आणि भाविकांनी मूर्तीचे विसर्जन मोठ्या टाकीत करावे आणि घरगुती मूर्ती मोठा टप, बादलीत करावे किंवा विसर्जन पुढे ढकलावे, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणच्या चाळी, झोपडपट्ट्या आणि इमारती कोरोना रुग्ण आढळून आल्याने सिल बंद करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोन, सील इमारतींमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यास मुंबई महानगरपालिकेने बंदी घातलेली नाही. मात्र, अशा ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना खबरदारीच्या सर्व उपाययोजना कठोरपणे पाळाव्यात असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. यामध्ये विसर्जनप्रसंगी गर्दी करू नये, मिरवणूक काढू नये, असे सक्त निर्देशही देण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून भूमिका बजावावी'
दरम्यान, कंटेन्मेंट झोन आणि सील इमारतींमध्ये कोरोनाच्या प्रसाराला वाव मिळू नये, यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यानुसार कंटेन्मेंट झोन आणि सील इमारतींमध्ये विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपआयुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बर्डे यांनी दिली.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ४ फुटांची मूर्ती, घरगुती गणेशोत्सवात दोन फुटी, शाडूची मूर्ती आणावी असे नियम घालून देण्यात आले आहे. शिवाय आगमन-विसर्जनाची मिरवणूक काढू नये, वारंवार निर्जंतुकीकरण करावे, मोठे कार्यक्रम आयोजित करू नयेत यासह कोरोना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी-खबरदारी घ्यावी असे निर्देश याआधीच पालिकेकडून देण्यात आले आहेत.
आतापर्यंत केवळ ७२१ अर्ज -
ऑगस्टच्या २२ तारखेपासून गणेशोत्सव सुरू होणार असली तरी यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे मंडळांकडून परवानगीसाठी कमी प्रतिसाद मिळत आहे. २० जुलैपासून ही प्रक्रिया सुरू झाली असताना पालिकेकडे ३० ऑगस्टपर्यंत केवळ ७६१ अर्ज आले आहेत. यातील ३०६ मंडळांना पालिकेकडून आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर नियमांची पूर्तता न करणारे ३९ अर्ज पालिकेकडून फेटाळण्यात आले आहेत. तर २९१ अर्जांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून यातील २ हजार ७०० मंडळे मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात.
मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासन, पालिकेने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन मंडळांकडून करण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन, सील इमारतींबाबत पालिकेने घेतलेल्या निर्णयाचेही सार्वजनिक समन्वय समिती स्वागतच करीत असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे.