मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईमधील ४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त २६ जणांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
लसीकरणाचा परिणाम -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. फेब्रुवारीच्या मध्यानंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. रोजची रुग्णांची संख्या ११ हजारावर पोहचली. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ४ लाख लोक कोरोनाबाधित झाले. या दरम्यान, मुंबईत कोरोनावरील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढत्या कोरोनामुळे लसीकरणाचे महत्वही लोकांना समजल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले. कोविशिल्ड व कोवॅक्सिनच्या लशी दिल्या जात आहेत. यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतरही १० हजार ५०० जणांना कोरोना झाला. मात्र दुसरा डोस घेतलेल्यांना अवघ्या २६ जणांनाच कोरोना झाला, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येत असला तरी लसीकरणानंतरही खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टनसिंग हे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
रोज दीड लाखांवर लसीकरण करण्याचे लक्ष्य -
सध्या लसीकरणाचा वेग वाढला असून रोज ६० ते ७० हजारावर जणांचे लसीकरणे केले जाते आहे. हा वेग आणखी वाढवला जाणार आहे. पुरेसा लशींचे डोस उपलब्ध झाल्यानंतर रोज दीड लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असेल असे काकाणी यांनी स्पष्ट केले.