मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहचले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२०९ दिवस इतका झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मागील पाच महिन्यांत तब्बल ४ लाख ११ हजार ६१५ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
- ३७४ रुग्णांची नोंद -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची पहिली लाट ओसरली होती. मात्र, त्याचवेळी मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. गेल्या पाच महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे दुसरी लाट ओसरत आली आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ११ हजारावर गेली होती. सध्या दिवसाला ३०० ते ५०० रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत आज ३७४ रुग्णांची नोंद झाली असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ४८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- रुग्ण दुपटीचा कालावधी १०९ दिवसांवर -
मुंबईमध्ये गेल्या दीड वर्षात ७ लाख ३३ हजार ११५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख ९ हजार १९८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ७५७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५ हजार ७७९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १२०९ दिवसांवर पोहचला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत एकूण ७८ लाख ९८ हजार ७०८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून येणाऱ्या ५ चाळी, झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून तर ६१ इमारती सील आहेत.
- ५ महिन्यात ४ लाख रुग्णांची कोरोनावर मात -
फेब्रुवारी २०२१ ला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. रुग्णांची संख्या तब्बल ११ हजारावर पोहचली. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यंत्रणाही कमी पडली. मात्र राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या घटली आहे. सद्यस्थितीत रोज आढळणा-या रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. तर बरे होणा-या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. २२ जुलैपर्यंत पाच महिन्यांत तब्बल ४ लाख ११ हजार ६१५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनाला मात केल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- या राबवण्यात आल्या उपाययोजना -
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहिर केले. पालिकेने रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांचा वेगाने शोध, कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी, चाचण्या, आरोग्य शिबिरे, उपचार पद्धती, सर्वेक्षण, क्वारंटाईन आदी नियमाची कडक अंमलबजावणीमुळे रुग्णांवर नियंत्रण आले.