मुंबई- पोलीस मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या जुहू पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चारही पोलिसांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मृताच्या नातेवाईंकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्यानंतर चौकशीअंती या ४ पोलिसांना अटक करण्यात आली.
विलेपार्ले परिसरात नेहरूनगर येथे राहणाऱ्या राजू देवेंद्र या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी या संदर्भात अज्ञात व्यक्तीकडून मारहाण झाल्याचा गुन्हा नोंदवला होता. मात्र, मृताच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावर एक चौकशी समिती बनविण्यात आली. समितीने केलेल्या चौकशीत जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे हे चार जण दोषी आढळून आले. त्यानंतर या चौघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. यानंतर पोलिसांना चौकशी दरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्याच्या आधारावर चार पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण-
लॉकडाऊन काळात राजू देवेंद्र हा त्याच्या कुटुंबासोबत बाहेर जात असताना त्यास पोलिसांनी हटकले होते. त्यावेळी घराबाहेर बाहर जाण्याचे योग्य कारण तो देऊ शकला नाही. या नंतर त्याला जुहू पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला होता.