मुंबई- लॉकडाऊन काळामध्ये गरजू व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून कर्ज मिळवून देतो, असे सांगत बनावट मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. लॉकडाऊन काळामध्ये आरोपींनी काही बनावट मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाइट बनवल्या होत्या. एवढेच नाही तर पंतप्रधान योजनेतून कर्ज दिले जात असल्याची जाहिरात देखील या आरोपींनी प्रसिद्ध केली होती. दोन लाखांपर्यंत कर्ज मिळेल असे या जाहिरातीमधून सांगण्यात आले होते.
'अशी' करत होते फसवणूक
आरोपींकडून बनवण्यात आलेले हे बनावट मोबाईल ॲप्लिकेशन तब्बल 2 लाख 80 हजार लोकांनी डाऊनलोड केले होते. त्यानंतर स्वतःची वैयक्तिक माहिती या ॲप्लिकेशनमध्ये भरून त्यांनी कर्जाची मागणी केली होती. मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून प्रत्येक व्यक्तीला आरोपी जयपूर व अलिगड येथील कॉलसेंटरमधून संपर्क साधत होते. त्यानंतर हे आरोपी कर्ज घेण्याच्या नावाखाली व्यक्तीकडून 8 ते 10 हजार रुपये घेत होते, त्यांनी आतापर्यंत अशाप्रकारे 4 हजार जणांची फसवणूक केल्याचा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संजीव कुमार, राजू भूपेंद्रकुमार राठोड, रामनिवास कुमावत व विवेक दिनेशबाबू शर्मा अशी या आरोपींची नावे आहेत.