मुंबई - विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा महागड्या गाड्या विद्यापीठाच्या तिजोरीतून खरेदी केल्याने राज्यभरात याविषयी पडसाद उमटले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधा शुल्क आणि इतर अनेक असंख्य प्रश्न असताना विद्यार्थ्यांच्या हिताच्या पैशातून अशा प्रकारच्या महागड्या गाड्या हव्यातच कशाला, असा सवाल मुंबई विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्यांकडून उपस्थित केला गेला आहे.
हेही वाचा - 'सरकारने अहंकारापोटी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली'
मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व 'बुक्टो' या प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी खरेदी केलेल्या अनुक्रमे 38 आणि 26 लाखांच्या दरम्यान किमतीच्या गाड्यांवर तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे, तर दुसरीकडे शुल्कासाठी, शिष्यवृत्ती, काही महाविद्यालयातील महागडे शुल्क, यासाठी विद्यार्थ्यांना दारोदार भटकावे लागण्याची वेळ आली असताना, अशा स्थितीत कुलगुरूंनी इतक्या महागड्या गाड्या घेणे हा पैशाचा निव्वळ अपव्यय आहे. त्यातच विद्यापीठात यापूर्वीच्या गाड्या सुस्थितीत असताना नवीन गाड्या घेण्याची कोणतीही गरज नव्हती, याची साधी जाणीव ही स्वतः प्रोफेसर सुहास पेडणेकर यांना कळू नये, ही मोठी शोकांतिका असल्याचे ही डॉ. साळवे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या पैशाची उधळपट्टी करून आपली हौस भागवण्याचा प्रकार यापूर्वी विद्यापीठात कधी झाला नसल्याची खंत डॉक्टर साळवे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी
'मुक्ता' या प्राध्यापक संघटनेचे महासचिव प्रा. सुभाष आठवले यांनीही कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या नवीन वाहन खरेदी प्रकरणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनीही विद्यापीठात असंख्य प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्याऐवजी अशा प्रकारच्या महागड्या गाड्यात खरेदी करून विद्यापीठाचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रकार असल्याचा आरोप प्रा. आठवलेंनी केला आहे. कुलगुरूंच्या या वाहन खरेदीवर विद्यार्थी संघटनांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात येत्या काळात कुलगुरू प्र-कुलगुरू यांना विद्यार्थी संघटनांकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.