मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने (Mumbai's Esplanade court) परवानगी दिली आहे. आता, पोलीस त्यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित करू शकतात आणि त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. जर ते ३० दिवसांच्या आत समोर आले नाहीत, तर मुंबई पोलीस (Mumbai Police) त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, असे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी सांगितले.
...नाही तर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया -
मुंबई गुन्हे शाखेतर्फे (Mumbai Crime Branch) सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने आज निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस हे आता फरार गुन्हेगार म्हणून घोषित करू शकतात. त्यानंतर ते जर पोलिसांसमोर हजर झाले नाही तर पोलिस त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यावर वॉरंटही जारी करण्यात आले होते -
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, सिंग सध्या गायब असून न्यायालयातही ते हजर राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स देखील बजावण्यात आला होता. मात्र, काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
- गुन्हे शाखेने न्यायालयात दिली होती माहिती -
मुंबई गुन्हे शाखेच्यावतीने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाने युक्तीवाद करताना वारंवार चौकशीचे समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले. परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले. मात्र, ते त्यांच्या कोणत्याही पत्त्यावर उपलब्ध नाहीत. तसेच कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांच्या संपर्कात नाहीत, असा युक्तीवाद हा गुन्हे शाखेतर्फे न्यायालयात करण्यात आला होता.
हेही वाचा - Param bir Singh : परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, मुंबई पोलिसांचे न्यायालयासमोर अर्ज