मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ( 100 Crore Recovery Case ) अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीने अटक केली होती. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली ( Anil Deshmukh Remanded Judivial Custody ) आहे.
अडचणीत होणार वाढ
100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असता त्यांना आज पुन्हा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने अनिल देशमुख यांना 2 फेब्रुवारीपर्यंत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 79 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. नुकतेच अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांना 15 दिवस ईडी कस्टडीमध्ये देखील ठेवले होते. गेल्या 70 दिवसांपासून अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहे. मागील 27 डिसेंबर रोजी अनिल देशमुख यांना न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज झालेल्या सुनावणीदरम्यान अनिल देशमुख यांना 2 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे तूर्तास तरी अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.