मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर परमवीर सिंह यांनी लावलेल्या आरोपानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगात बुधवारी (दि. 5 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. आयोगात पुन्हा सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील ACP Sanjay Patil( ) यांची उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी एसीपी पाटील यांना अनिल देशमुख यांनी आपल्याला बार मालकाकडून हफ्ता गोळा करायला सांगितले नाही, असा खुलासा केला. गुरुवारी (दि.06 जानेवारी) पुन्हा संजय पाटील यांची उलटतपासणी आयोगासमोर होणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांना मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये हफ्ता गोळा करायचे आदेश दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. हा आरोप एका पत्राद्वारे परमबीर सिंह यांनी केला होता. या पत्राच्या आधारावर पुढे जनहित याचिका दाखल झाली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर या 100 कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची नेमणूक केली आहे.
यानंतर संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी एसीपी पाटील यांची उलटतपासणी केली. मी मुंबई पोलीस दलात येण्यापूर्वी संजय पालांडे यांना वैयक्तिक ओळखत नव्हतो. माझी त्यांच्यासोबत वैयक्तिक मैत्री नाही. संजीव पालांडे हे गृहमंत्री यांचे स्वीय सहायक असताना मी कधीही त्यांच्याशी संवाद साधला नाही. 1 मार्च, 2021 रोजी कार्यालयीन कामासाठी बैठक झाली होती. त्या बैठकीला पालांडे हे हजर होते. यावेळी मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. पालांडे यांनी मला कधी ही फोन किंवा एसएमएस केलेला नाही, असे आयोगाला सांगितले.
हेही वाचा - Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर 11 जानेवारीला सुनावणी