मुंबई - नारायण राणे यांच्या कट्टर समर्थक आणि चेंबूरच्या माजी नगरसेविका निलम डोळस यांनी आज (दि.३१ऑगस्ट) ला शिवसेना भवन येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला आहे. डोळस यांच्या पक्षप्रवेशामुळे नारायण राणेंना मोठा धक्का बसला असून, ईशान्य मुंबईतील नेते हरीश विचारे यांनीही यावेळी शिवबंधन बांधले.
शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. निलम डोळस स्वगृही परत आल्या आहेत, असे मानखुर्दचे आमदार तुकाराम काते यांनी यावेळी सांगितले. त्यांचा अनुभव कामी येईल असे म्हणून, डोळस यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देऊन आमदारांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
तसेच ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मुरबाड तालुक्यातील माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सु़भाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे आठ सदस्य, बाजार समिती सभापती व कल्याण पंचायत समितीचे सभापती यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.