मुंबई - शहरात कमी वेळात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यामुळे पूर येऊन मुंबई ठप्प होते. अतिवृष्टी होऊन पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा कमी पडते. त्यासाठी त्याचे नियोजन काटेकोर, अचूक, शास्त्रशुद्ध गोष्टींचा विचार करून केले जावे, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांनी दिला आहे. मुंबईतील पूरस्थिती मानवनिर्मित असून त्याचा सर्वात जास्त फटका गरिबांना बसतो, असेही मेहता म्हणाले.
मुंबई पालिका आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिटयूटतर्फे ‘मुंबई महानगरास असलेला पुराचा धोका’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी मेहता यांच्यासह मुंबई पालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू उपस्थित होते.
काटेकोर नियोजन महत्वाचे - मुंबई तुंबण्यामागच्या कारणांचा विचार करताना पूरमय स्थिती उद्भवणे हे मानवनिर्मित कारण आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा गोरगरिबांना सहन करावा लागत असल्याचा मुद्दा मेहता यांनी मांडला. मुंबईत एकाचवेळी ठराविक वेळेत प्रचंड पाऊस पडल्यास त्याचा ताण पाण्याच्या निचरा करणाऱ्या यंत्रणेवर होत असतो. म्हणूनच ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाय योजले जातात. पण त्या गोष्टी अमलात आणताना त्यातील काटेकोर नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे मेहता म्हणाले. शहरात एखादी इमारत, उद्यान उभारतानाही त्याचा सर्वंकष पद्धतीने विचार होणे गरजेचे आहे. त्यातील छोट्या मोठ्या गोष्टीमधील त्रूटीही अडचणी निर्माण होत असल्याचे अनुभव येत असतात. तेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी नेमकी काय त्रूटी आहे, त्यातून कसा मार्ग काढता येईल, हे ठरविता येत असल्याचे मेहता यांनी सांगितले.
नियंत्रण शक्य पण पूर्णपणे संपवू शकत नाही - मुंबईत २६ जुलै २००५ मधील अतिवृष्टीप्रमाणे एकाच दिवसात ९०० मिलिमीटर पाऊस पडला. असा पाऊस पुन्हा कधीही पडला नाही. अशा घटना शंभर वर्षातून एकदाच होतात. मुंबई पावसाच्या दृष्टीने पालिकेकडून तयारी केली जाते. परंतु, मुंबईची २५० मिलिमीटर पावसाच्या पाण्याची निचरा करण्याची क्षमता आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्यापेक्षा अधिक क्षमता नाही. पूरमय स्थितीचा संदर्भ देताना फाटक यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे उदाहरण दिले. देवेगौडा यांनी भ्रष्टाचाराची तुलना मधुमेहाशी करताना दोन्ही गोष्टी नियंत्रण आणल्या जातात. परंतु, त्या पूर्णपणे आपण संपवू शकत नाही, असे सांगितल्याचा संदर्भही फाटक यांनी यावेळी दिला.