मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा, अशी लेखी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यातील पूरग्रस्त बांधवांचे उजाड झालेले संसार उभारण्यासाठी समाजातील सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याना एक पत्र लिहून पूरग्रस्त व्यापाऱ्यांची मदत करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नाशिक, वसई, विरार आणि पालघर याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे हजारो घरे, दुकाने, कार्यालये, गोदामे आणि कारखाने यांचे अतोनात नुकसान झाले.
केंद्र आणि राज्य सरकार पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करत आहे. याशिवाय सामाजिक संस्था, शिवसेना मदत निधी आणि खासगी अनुदान, अशा विविध माध्यमांतून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याचवेळी पूरग्रस्त व्यापाऱ्यांनाही सरकारी मदतीची गरज आहे. त्यांना जीएसटी माफ केल्यास मोठा दिलासा मिळू शकेल, असे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.