मुंबई - शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी हॉटस्पॉट ठरली होती. ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्नमुळे रुग्ण संख्या नगण्य झाली आहे. धारावीत चौथ्यांदा तर दादरमध्ये तिसऱ्यांदा एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. धारावी सारख्या झोपडपट्टीने जगाला कोरोना मुक्तीचा मार्ग दिला आहे.
धारावी पॅटर्न -
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत १ एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. कोरोनाने शिरकाव केल्यानंतर ८ लाखांच्या दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले आहे.
चौथ्यांदा शून्य रुग्ण -
पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच जुलै महिन्यापासून धारावीत रुग्णसंख्या खर्या अर्थाने नियंत्रणात आली. जुलै महिन्यात धारावीत कोरोनाचे दोन नवे रुग्ण होते तर ५१९ अॅक्टिव्ह रुग्ण होते. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारीला दुसऱ्यांदा, २६ जानेवारीला तिसऱ्यांदा तर आज २७ जानेवारीला चौथ्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. धारावीत आतापर्यंत ३९११ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ३५८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या १४ सक्रिय रुग्ण आहेत.
दादरमध्ये तिसऱ्यांदा शून्य रुग्ण -
दादरमध्येही २६ डिसेंबरला, २१ जानेवारीला तर आज २७ जानेवारी अशा तीन वेळा शून्य रुग्ण आढळून आले आहेत. दादरमध्ये आतापर्यंत ४९१२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ४६५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ८४ सक्रिय रुग्ण आहेत. माहिममध्ये आतापर्यंत ४७५८ रुग्ण आढळून आले असून ४४९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ११६ सक्रिय रुग्ण आहेत.