मुंबई - भारतीय संस्कृतीत भुकेल्याना अन्नदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. मानखुर्द, गोवंडी झोपडपट्टी सारख्या ठिकाणी अनेक गरीब लोक राहताना दिसून येतात. अशा सर्व काबाडकष्ट करणाऱ्या लोकांना मानखुर्दमधील काही तरुण मंडळी एकत्र येऊन यांना अन्नदान करत आहेत.
देशामध्ये गरीब लोकांची संख्या कमी नाही. आजही देशात कोरोनामुळे कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ येत असते. कोरोना महामारीमुळे सुमारे 2 वर्ष लॉकडाऊन असल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. असे चित्र असताना दुसरीकडे अनेक लोक मोठ्या प्रमाणात अन्नदान करताना दिसून येत आहेत. मानखुर्दमधील काही तरुणांनी एकत्र येऊन गरिबांना व भुकेल्यांना जेवणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
हेही वाचा-'वंदे भारत मिशन'द्वारे 90 लाखांहून अधिक भारतीयांना आणले मायदेशी
गरजुपर्यंत अन्न पोहोचविण्याचे प्रयत्न-
एक महिनाहून अधिक काळ तरुण एकत्र येऊन अन्नदान वाटप करत आहेत. दररोज किमान २०० अधिक लोकांना यांच्याकडून अन्नवाटप केले जाते. काही स्थनिक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन हे कार्य केले जात आहे. विवेक वरे, प्रकाश वाघमारे, रीमा चौधरी, तृप्ती सकपाळ, ज्योती नंदेवार,मयूर शेळके, शुभांगी गेजगे हे तरुण एकत्र येऊन हे सामाजिक काम करत असतात. ज्या घरात चूल पेटत नाही, जे लोक उपाशी राहतात अशा लोकांपर्यंत आम्हाला हे अन्न घेऊन पोचवायचे आहे, असे या तरुणांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. स्थानिक पातळीवर अनेक लोकांनी या तरुणांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा-शिवसेना आमदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर; वीजबिलप्रश्नी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे