मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील गोरगरीब-मजुरांना दोन वेळेचे जेवण देण्यासाठी विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहेत. या किचनमध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याबरोबर फिजिकल डिस्टनसिंग आणि इतर स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात आहे का, याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ने सुरू केली आहे. सुरुवातीला नियम पाळण्यासंबंधी सूचना केल्या जाणार आहेत. तर सूचना केल्यानंतर काही दिवसांत त्याचे पालन झाले नाही, तर याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा... '..ही शहाणे होण्याची वेळ.. भारत-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करा'
लॉकडाऊनमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट, फूड स्टॉल असे सर्व काही बंद आहे. त्यात मुजराचे काम बंद असून सर्व रोजगारही बंद आहे. त्यामुळे गोरगरीब आणि मजुरांच्या भुकेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई महानगरपालिका, सरकार आणि सेवाभावी संस्थानी कम्युनिटी किचन सुरू करत त्यांना अन्न पुरवत आहेत. मुंबईत मोठ्या संख्येने किचन सुरू आहेत. अशावेळी या गोरगरीब-मजुरांना स्वच्छ ताजे आणि सुरक्षित अन्न मिळणे गरजेचे आहे. तर ते बनवताना आणि त्याचे वितरण करताना ही सर्व नियम पाळत कोरोनासह अन्नबाधा होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर एफडीएने आता या कम्युनिटी किचनकडे मोर्चा वळवला आहे. आठवड्याभरापासून कम्युनिटी किचन, रुग्णालयातील किचन आणि क्वारंटाइन करण्यात आलेल्या ठिकाणच्या किचनची ही तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे. आता फक्त नियम पाळले जात आहेत का, हे तपासत सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. तर या सूचना केल्यानंतर आठवड्याभरात सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.