मुंबई - गेले सहा महिन्याहून अधिक काळ पालिकेचे सभागृह आयोजित केलेले नाही. यामुळे अनेक नगरसेवकांना आपल्या विभागातील प्रश्न मांडता आलेले नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभागृह आयोजित केल्यावर अनेक तांत्रिक कारणामुळे नगरसेवकांना सभागृहात सहभाग घेता आलेला नाही. त्यासाठी नेहमी सभागृह भरते त्याप्रमाणे प्रत्यक्ष सभागृह आयोजित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्चपासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा प्रसार होईल या भीतीने पालिकेचे सभागृह आयोजित करण्यात आलेले नव्हते. राज्य सरकारने सभागृह आणि समित्यांच्या बैठका, निवडणुका व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचा सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार सभागृह आयोजित करण्यात आले. मात्र, इंटरनेटच्या स्पीडमुळे अनेक नगरसेवकांना ऑनलाईन सभागृहात सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात मांडायचे असताना त्यांना ते प्रश्न मांडता आलेले नाहीत.
यासाठी पालिकेचे सभागृह ऑनलाईन न घेता ज्या प्रमाणे ते आयोजित केले जात होते. त्याप्रमाणे सभागृह आयोजित करावे, अशी मागणी केल्याचे जाधव यांनी सांगितले. सभागृहात सोशल डिस्टनसिंग असावे म्हणून माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल किंवा जुन्या सचिवालयात सभागृह आयोजित करावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या मागणीला सर्व पक्षीय गटनेते आणि नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी नगरविकास विभागाशी संपर्क साधून चर्चा करून पर्याय काढावा, असे आदेश महापौरांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.