मुंबई - महानगरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. पण हा प्रकल्प आता वरळी हाजी अली परिसरातील मच्छिमारांच्या पोटावर पाय देणारा ठरत आहे. कारण या मच्छिमारांच्या पार्किंगची जागा ताब्यात घेत पालिकेने त्यावर भराव टाकला आहे. तर ही जागा घेतली पण त्यांना पर्यायी जागा काही दिली नाही. त्यामुळे मच्छिमारांना बोटी लावण्यासाठी मोठी अडचण येत असून त्याचा व्यवसायावर ही परिणाम होत आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका लक्ष देत नसल्याने आता मच्छिमारांनी आज पालिकेकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. पार्किंगची सोय करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर ही मागणी मान्य झाली नाही तर न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - Breaking : राज्यात 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी
पालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पर्यावरण प्रेमी आणि काही मच्छिमारांनी विरोध केला आहे. हा वाद उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. यावर अजून सुनावणी सुरू आहे. दरम्यान आता इतर मच्छिमारांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मुळात या प्रकल्पामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी होत चालले आहे. कारण जिथे कोस्टल रोडची कामे करण्यात येत आहेत, ती जागा माशाच्या प्रजननाची असल्याने आता मासे कमी होत आहेत. त्यामुळे मच्छीमार अडचणीत आले आहेत. वरळी कोळीवाडा आणि आसपासचे मच्छीमार याविरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत.
हेही वाचा - उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 'बिगीन अगेन'..
अशात आता हाजी अली परिसरातील मच्छीमार ही या प्रकल्पाला विरोध करू लागले आहेत. कारण त्यांच्या ही पोटावर आता हा प्रकल्प उठल्याची माहिती वंचित मच्छीमार संघटनेचे अल्लाऊदिन नियाज खान यांनी दिली आहे. सध्या कुठेही आम्ही बोटी पार्क करत आहोत. पण त्यामुळे कामात अनेक अडचणी येत असल्याचे खान यांनी सांगितले आहे.
पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. पण पालिका काही लक्षच देत नाही. त्यामुळे आज आम्ही याविरोधात लेखी तक्रार पालिकेकडे केली आहे. ही मागणी येत्या काही दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात याविरोधात धाव घेण्याच्या विचारात आहोत, असेही खान यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कोस्टल रोडला होणारा विरोध आणखी वाढणार, असे चित्र आहे.