रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/ रायगड - महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका मच्छिमारांना बसला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत होत असलेली परप्रांतीय बोटींची घुसखोरी, शासनाकडून आलेल्या मदत मिळवण्यासाठीच्या जाचक अटी, शासनाच्या योजनांची माहिती मच्छिमारांपर्यंत व्यवस्थित न पोहचणे आदी अनेक समस्यांचा सामना सध्या मच्छिमारांना करावा लागत आहे.
सततच्या संकटांमुळे मासेमारी हंगामावर परिणाम -
शेतीबरोबरच मासेमारी हा कोकणातील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय आहे. राज्याला लाभलेल्या 720 कि.मी.च्या एकूण समुद्रकिनाऱ्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या 528 किमी किनारपट्टी भागात मासेमारी होते. मात्र, समुद्रात वारंवार होणारी वादळे, बदलते हवामान, डिझेल परतावा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न मच्छिमारांसमोर आहेत. यावर्षी कोरोनामुळेही मासेमारी हंगामावर परिणाम झाला.
एलईडी मासेमारी बंद झाली पाहिजे -
परराज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या बोटी एलईडी लाईट लावून मासेमारी करतात. ती पूर्णतः बंद झाली पाहिजे. राज्य सरकारने याबाबत कडक नियम केले पाहिजेत. सध्या असलेल्या जेटींंचा मेंटेनन्स वेळेत करण्यात यावा अशीही मागणी मच्छिमारांनी केली आहे.
कोरोनानंतर वादळांनीही मच्छिमारांची केली आर्थिक कोंडी
कोरोना महामारीनंतर सुरू झालेला पावसाळा त्यामुळे मासेमारी बंद. एवढं संकट असताना पुन्हा आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने पुन्हा मच्छिमारांचे कंबरडेच मोडले. वादळात बोटीचे, जाळ्याचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची मदत शासनाकडून आली. मात्र ती सुद्धा अपुरी आली असल्याने अनेकांना अद्यापही मिळालेली नाही. त्यातच सप्टेंबर पासून मासेमारी सुरू झाल्यानंतर पुन्हा वादळ घोंघावू लागले आणि पुन्हा हजारो बोटी धक्क्याला लागल्या. नोव्हेबर डिसेंबर हा मच्छीचा हंगाम असताना तामिळनाडूमध्ये झालेल्या वादळाने समुद्रातील मासेमारी कमी झाली. त्यामुळे बोटींचा, डिझेल, कर्मचारी यांचा खर्च करणे कठीण होऊ लागले आहे.
मासळीसोबत उत्पन्न ही घटले -
सतत येत असलेल्या वादळाने आणि थंडीमुळे समुद्रातील मासळीवर परिणाम झाला आहे. समुद्रात मोठी मासळी मिळणे कठीण झाले आहे. मासेमारीसाठी आठ दहा दिवसासाठी जाणाऱ्या बोटीवरील डिझेल, कर्मचारी याचे खाणेपिणे, पगार याचा खर्चही सुटत नाही. मासळी कमी झाल्याने झवळा ही छोटी मच्छी मिळत असल्याने त्यातून खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेल खर्च, कुटूंब यावर होणारा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न मच्छिमाराना पडला आहे.
जेट्टीसह इतर सुविधांचा अभाव -
दिवसेंदिवस मा्सेमारी करणाऱ्या बोटींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र बोटी लावण्यासाठी जेट्टीची जागा कमी पडू लागली आहे. तसेच जाळी विणणे आणि मच्छी सुकविणेसाठी ओटी, स्वच्छतागृह, शीतगृहे या सुविधा अद्यापही अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या अडचणींचा सामनाही मच्छीमाराना करावा लागत आहे.
सिंधुदुर्गात मासळी उद्योगासमोरील समस्या वाढल्या
देवगड, मालवण, वेंगुर्ला या तीन तालुक्यांच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मात्र, या तिनही तालुक्यात मच्छिमारांच्या बोटी अत्यंत सुरक्षितपणे लागतील, अशी एकही बंदर-जेटी नाही. तसेच मासळी साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज नाही. मच्छिमारांच्या समुद्रातील समस्याही अत्यंत वाईट अनुभव देणाऱ्या आहेत.
अवैध मासेमारीमुळे आर्थिक सुबत्ता देणारे मासे घटले-
दिलीप घारे हे रापण हा पारंपरिक मच्छिमार व्यवसाय करतात. ते श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष आहेत. मागील १० ते १२ वर्ष सातत्याने मच्छिमार मासेमारीतील अडचणींविरोधात लढा देत आहे. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. तसे होत नसल्याने मच्छिमार मत्स्य दुष्काळाशी सामना करत आहे. हा सामना करत असताना समुद्रात ज्या आर्थिक सुबत्ता देणाऱ्या माशाच्या प्रजाती आहेत, त्या सततच्या अवैध मासेमारीमुळे कमी होत आहेत. परिणामी मच्छिमार आपला रोजगार गमावून बसले आहेत. यासाठी सातत्याने मच्छिमार संघटना हायस्पीड गस्ती बोटींची मागणी करत आहेत. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या गस्तीच्या बोट उपलब्ध आहेत, त्या अत्याधुनिक बोटींपेक्षा कमी क्षमतेच्या आहेत. आज या किनारपट्टीवर जवळपास ८० टक्के नौका उभ्या आहेत. माशांचे साठे कमी होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे, असे ते म्हणाले.
नुकसान सोसतो आणि घरी येतो मच्छिमार -
मालवण दांडी गावातील संतोष प्रकाश पेडणेकर हे मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते म्हणाले म्हणाले, आम्ही समुद्रात गेल्यानंतर हायस्पीड वाले, एलईडी लाईटवाले, पर्ससीन नेट वाले हे थेट आमच्या जाळ्यांवरून बोटी घेऊन जातात. त्यामुळे आमचे नुकसान होते. आम्ही काही बोलत नाही, कारण ते मोठ्या संख्येने असतात. दादागिरी करतात. बऱ्याचवेळा ते आमची जाळीही तोडून घेऊन जातात. सूर्य मावळला की किनाऱ्याच्या जवळ घुसतात. दिवसा ते २० ते २५ वाव अंतराच्या बाहेर असतात आणि रात्री ते १२ वाव अंतरावर येतात. त्यांच्या कल्पने बोटी असतात. त्यामुळे आम्ही त्यांना काही करू शकत नाही. आम्ही काही केल्यास ते आम्हाला मारून टाकतील, आमच्या बोटी फोडून टाकतील. त्यामुळे नुकसान झाले, तरी आम्ही गप्प बसतो. त्यांच्या बोटी मलपी बंदर, गुजरात, मुंबई, गोवा या भागातून येतात. नजर पोचत नाही एवढ्या उंच असतात. त्यांच्या आम्ही जवळ जाऊ शकत नाही. नुकसान सोसतो आणि घरी येतो असे त्यांनी सांगितले.