मुंबई - कोरोनाचे आकडे ऐकून चिंतेत असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत पहिली कोरोनाबाधित रुग्णावरील प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी ठरली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. हा रुग्ण आता ठणठणीत झाला असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
आयएमआरसीच्या निर्देशानुसार राज्य सरकारने गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी पद्धतीने उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही दिवसांपूर्वी लिलावती या खासगी रुग्णालयातील एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. पण ही थेरपी यशस्वी झाली नाही आणि रुग्णाचा मृत्यू झाला. पण आता मात्र नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे. तीन दिवसापूर्वी एका 45 वर्षीय कोरोनाबाधित नायरमध्ये प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. आता या रुग्णाची तब्येत सुधारली असून पुढच्या दोन-तीन दिवसांत त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले आहे. आता यापुढेही प्लाझ्मा थेरपीचे प्रयोग सुरुच राहतील असेही त्यांनी सांगितले.