मुंबई - देशात आणि राज्यात सर्व प्रकारच्या रुग्णालयांमध्ये आग सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. तर काहीवेळा अति गंभीर अपघात होऊन अनेक लोकांचे प्राण त्यामध्ये गेलेले आहेत. याबाबत कोरोना काळामध्ये पालघर, मुलुंड आणि विदर्भामध्ये मोठ्या घटना घडल्याचे आपण पाहिलेले आहे. या दुर्घटनेतून धडा घेऊन पुन्हा दुर्घटना होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील अभियांत्रिकी विभागाच्या पुढाकारातून अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. जगजीवन राम रुग्णालय आता या सुविधांनी सुसज्ज झाले आहे.
आगीच्या अपघातावर येणार नियंत्रण - रेल्वेचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या परिसरात जगजीवन राम रुग्णालय या ठिकाणी दिवसातून शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. या रुग्णालयामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेक दिवसांपासून ही यंत्रणा बसवण्याची मागणी केली गेली होती. रेल्वेकडून आता ही अग्निसुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी बसवली गेली आहे. ही यंत्रणा कार्यरत देखील झाली आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा नसेल तर शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेले लोक जे रुग्णालयामध्ये असतात किंवा रुग्ण म्हणून देखील दाखल झालेले असतात. या सगळ्यांना अपघात घडल्यास अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यावर जीव गमावण्याची पाळी येते. यापासून त्यांच्या जीविताची हानी होऊ नये म्हणून ही अग्नी सुरक्षा यंत्रणा बसवल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले.
आग प्रतिरोध आणि त्याचा इशारा देण्याची यंत्रणा - पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संवाद करतेवेळी त्यांनी ईटीवी भारतला माहिती दिली की, या अग्नी सुरक्षा यंत्रणामध्ये आग प्रतिरोध आणि त्याचा इशारा देण्याची यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये फायर पंप देखील आहे. स्वयंचलित स्प्रिंकलर सिस्टम आहे. फायर हायड्रेट तसेच अग्निशामक बादली एअर सोल सिस्टम ड्रेंचर लाईन अशा अनेक छोट्या छोट्या उपकरणांसह यंत्रणा कार्यरत आहे. पश्चिम रेल्वेकडून 1100 स्प्रिंकलर 70 अग्निशामक बसवले आहेत. प्रत्येक तीन सेंट्रीफ्यूगल आणि जॉकी पंप तसेच 5000 लिटर क्षमता असलेले बूस्टर पंप देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. ही सर्व यंत्रणा 'राष्ट्रीय इमारत संहिता 2016' च्या अनुसार करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केले.