मुंबई - कांजूरमार्ग येथील अवजड औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागली आहे. सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये ही भीषण आग लागली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकस वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग लागताच या ठिकाणचे कर्मचारी बाहेर पडले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आम्हाला रात्री 9 च्या सुमारास माहिती मिळाली, की मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या १०-१२ गाड्या येथे आहेत. स्थानिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे, अशी प्रतिक्रिया झोन ७ चे डीसीपी प्रशांत कदम यांनी दिली आहे.
संध्याकाळी ७:३० च्या सुमारास आग लागल्यानंतर सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याने गोडाउनमध्ये कोणीही अडकलेले नाही. मात्र तरी देखील काही लोक आत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप तरी या भीषण आगीत कोणताही जिवीतहानी झालेली नाही. गोडाउनमध्ये इलेक्ट्रिक्स वेअर हाऊसेस, सफोला ऑईल्ससारखे डिस्ट्रिब्युटर्स असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. कांजूरमार्ग येथे आग लागलेल्या ठिकाणच्या आजूबाजूचा परिसर हा इंडस्ट्रियल परिसर आहे. त्यामुळे आगीची माहिती मिळताच आजूबाजूच्या इमारतीतील नागरिकांना देखील बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन डिलिवरीसाठी जे ऑर्डर असतात त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यासाठी याठिकाणच्या गोदामचा वापर केला जात होता. त्याशिवाय येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करण्याचेही काम चालते. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु होते. सॅमसंग सर्व्हिस सेंटरशिवाय या परिसरात ३ अन्य कंपन्यांचे गोदाम आहे. त्यात सफोला एडिबल ऑयलचे गोदाम आहे. आगीचे भीषण स्वरुप पाहता आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. आग ज्याठिकाणी लागलेली आहे, त्याजवळ एक झोपडपट्टीही आहे. आगीमुळे झोपडपट्टीमध्ये येण्या जाण्याचा मार्ग बंद ठेवला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. रात्री उशीरा ही आग नियंत्रणात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Maharashtra violence हिंसक घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील