मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात आज दुपारी चारच्या सुमारास मोकळ्या जागेवर असलेल्या गवताला मोठी आग लागल्याची घटना घडली. आगीच्या धुराने कलिना परिसरात काही वेळ धुक्यासारखे वातावरण निर्माण झाले होते.
तीन ते पाच एकरवर असलेल्या गवतासोबत आंबा, निंब, फणस, आदी विविध जातींची लाहान झाडे या आगीत जळून खाक झाली. आग इतकी मोठी होती की, तब्बल ७ अग्निशमन गाड्या आणि २० हून अधिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी ३ तास परिश्रम करावे लागले.
ज्या ठिकाणी ही आग लागली त्यांच्या काही पावलांच्या अंतरावरच कुलगुरू, कुलसचिव यांचे कार्यालय असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, तर काही अंतरावर क्रीडा भवन आहे. ही आग लागली की लावण्यात आली याविषयी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. तर आग लागलेल्या परिसराच्या बाजूला जाणारे रस्ते विद्यापीठ प्रशासनाने काही वेळ रोखुन धरले होते.