मुंबई - भांडुप येथील ड्रीम्स मॉल, सनराईज हॉस्पिटलला आगीची घटना ताजी असतानाच प्रभादेवी येथील गॅमोन हाऊस इमारतीला आग लागली आहे. घटनास्थळी 8 फायर इंजिन, 8 जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थींचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली.
गॅमोन हाऊस आग -
मुंबईच्या प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्गावर गॅमोन हाऊस ही चार मजली इमारत आहे. या इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या गोडाऊनला सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन, 8 जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. ही आग लेव्हल-2ची म्हणजे छोटी असल्याने कोणीही जीवितहानी झालेली नाही.
ड्रीम्स मॉल आगीत ११ मृत्यू, ५ जखमी, २१ बेपत्ता -
२५ मार्चला रात्री ड्रीम्स मॉलमधील सनराइझ रूग्णालयामध्ये आग लागली. अग्निशामक दलाच्या १४-फायर इंजिन आणि १०-जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने तब्बल २३ तासांनी ही आग नियंत्रणात आली. काचेची इमारत, त्यात कोंडून राहिलेला धूर, मॉलमध्ये आत शिरण्यास अपुरी जागा यामुळे आग विझवण्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. रुग्णालयामधील ७८ पैकी ४६ रुग्णांना इतर रूग्णालयात भरती करण्यात आले. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर, इतर २१ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.