मुंबई - अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहनांवर वाहतूक विभागाने तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश खासदार अरविंद सावंत यांनी दिलेत. तर मुंबई पालिकेकडून मोफत पार्किंगची सुविधा असताना त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओल्ड कस्टम हाऊस येथे रस्ते सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार अरविंद सावंत तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला आमदार यामिनी जाधव, अजय चौधरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या -
मुंबईतील रस्ते एकतर्फी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी या बैठकीत मांडली. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने पुलाच्या पुनर्विकासाचे काम करताना स्थानिक नागरिकांना त्यांचे बांधकाम तोडण्याबाबत महापालिकेतर्फे नोटीस पाठविण्यात येतात. ही नोटीस पाठविताना लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला विश्वासात घेतल्यास संबंधित नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांना कारवाईबाबत तयार करण्यास मदत करू शकतो, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी यावेळी मांडली.
तातडीने कारवाई करा -
दारूखाना येथे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असून या अनधिकृत वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सावंत यांनी यावेळी दिले. तसेच मुंबई शहरात दररोज किती गाड्या येतात याची सविस्तर माहिती मिळावी, त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व नगरसेवकांसोबत तातडीने बैठक घेऊन त्यांना या सर्व बाबींची कल्पना देण्याचे निर्देशही खासदार सावंत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मोफत पार्किंगकडे दुर्लक्ष -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आपली वाहने पार्क करण्यासाठी अधिकृत पार्किंग स्थळ मोफत उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी नागरिक आपली वाहने पार्क करत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.