मुंबई - देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करावे लागले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला देखील ब्रेक लागला आहे. अनेक पालकांची नोकरी गेली आहे. अनेकांना शहरातून ग्रामीण भागात परतावे लागले आहे. तर काही पालक मुलाची फी भरू शकत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्यासाठी देखील सुरुवात झाली आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शोधमोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये 25 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य झाले असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये मुंबई उपनगरात असणाऱ्या झोपडपट्टीमधील सर्वाधिक विद्यार्थी असल्याचे दिसून आले आहेत.
विद्यार्थांसाठी आर्थिक मदतीची योजना
झोपडपट्टी परिसरात असणाऱ्या शाळांचे काही मुख्याध्यापक एकत्र आले आहेत. ते क्राऊड फंड गोळा करत आहेत. त्यातून मालाड, मालवणी, धारवी, चेंबूर, मानखुर्द, ट्रॅबे अशा विविध झोपडपट्टीत असणाऱ्या शाळेच्या या विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. यावर उपाय म्हणून गुरुकुल शाळेने बेअरफुट या संस्थेच्या मदतीने मुंबईच्या विविध झोपडपट्टीतील शाळांमधील एक हजार गरजू विद्यार्थांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची योजना आखली आहे. जेणेकरून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच सदर शाळांना तंत्रज्ञान व विविध शालेय विषयांचे प्रशिक्षण देऊन वर्षभर आधार दिला जाईल.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर; 1362 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू