मुंबई - महापालिकेचे गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय धोकादायक असल्याचे सांगून १७ महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले होते. या रुग्णालयाची दुरुस्तीसाठी किंवा नव्याने बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नसल्याने या रुग्णालयाची इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे गोरेगाव ते मालाड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गोरेगाव येथे पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. १९९५ - १९९७ दरम्यान ही इमारत बांधून येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयामुळे गोरेगाव ते मालाड दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत होती. मात्र, १७ महिन्यापूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे सांगत रुग्णालय बंद करण्यात आले. रुग्णालय बंद केल्याने येथील स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत सिद्धार्थ रुग्णालय बचाव संघर्ष समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून वर्षभरापासून आंदोलन, जनजागृती, माहिती अधिकाराखाली रुग्णालयासंबंधी माहिती मागवणे, पालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, पी- दक्षिण विभाग, नगरसेवक यांना निवेदने देणे, अशी चळवळ चालू ठेवली.
सध्या लोक जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. पत्रक वाटून लोकांच्या सह्या घेतल्या जात आहेत. सिद्धार्थ रुग्णालय वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच कालपासून (गुरुवार) हे रुग्णालय पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिद्धार्थ रुग्णालय बंद असल्याने या विभागातील नागरिकांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात किंवा कांदिवली येथील भगवती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ये जा करावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.
इमारत धोकादायक झालीच कशी -
मुंबई महापालिकेच्या नियमानुसार ३० वर्ष जुन्या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले जाते. या ऑडिटमध्ये इमारतीची डागडुजी करण्यास डागडुजी केली जाते. या ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचे समोर आले तरच इमारत धोकादायक असल्याचे घोषित केले जाते. १९९५ ते ९७ दरम्यान सिद्धार्थ रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली होती ती २४ ते २५ वर्षात धोकादायक झालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.