मुंबई - अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत ओशिवरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या गाडीत आणि कडक पोलिस बंदोबस्तात त्याचे पार्थिव दुपारी 1.20 वाजता कूपर रुग्णालयातून स्मशानभूमीकडे रवाना झाले.
अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूपूर्वीच्या आदल्या दिवशी सिद्धार्थ आईसोबत फिरायला गेला होता. त्यादिवशी रात्री त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने काही औषधे घेतली होती. आणि नंतर तो उठलाच नाही. नंतर त्याच्या आईने मुलगी प्रीतीला बोलावले आणि सिद्धार्थला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
खून की आत्महत्या ? चर्चांना पूर्णविराम
बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. पण त्याचे अकाली निधन म्हणजे आत्महत्या आहे का, किंवा कोणी त्याचा खून केला का अशी चर्चा आता रंगली आहे. पण या चर्चांचे स्पष्टीकरण देताना, आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सिद्धार्थच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
या कलाकारांनी घेतले शेवटचे दर्शन
सिध्दार्थ आणि त्याची आई रिटा तसेच आल्या गोनी, असिम रियाझ, पारस छाब्रा. माहिरा खान, अभिनव शुक्ला, जय भानुशाली, माही विज हेही उपस्थित होते. शुक्लाची मैत्रीण आणि प्रेयसी असलेली शेहनाझ गिल , भावासह उपस्थित होती. राजकुमार राव आणि वरुण धवन यांनीही शुक्लाच्या कुटुंबियांना भेट दिली.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
सिध्दार्थच्या व्हिसेरा आणि हिस्टोपॅथोलॉजी चाचण्यांच्या रासायनिक विश्लेषणाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण कळेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. "शवविच्छेदन अहवालानुसार त्याच्या तोंडावर, अनैसर्गिक मृत्यूची कोणतीही चिन्हे नव्हती " असेही त्यांनी सांगितले. अभिनेत्याचा व्हिसेरा अहवाल मुंबईतील कालिना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफएसएल) पाठवण्यात आला आहे आणि काही अवयव वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे आर एन कूपर हॉस्पिटलच्या मधील सूत्राने सांगितले.
दोन दिवसात व्हिसेरा रिपोर्ट
अधिक चांगल्या परिणामासाठी आम्ही एफएसएलकडे व्हिसेरा रिपोर्ट पाठवला, असेही हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले. " पॅथॉलॉजी लॅब अवयवांमध्ये विषबाधा आणि इतर तपशीलांचा एफएसएल तपास करेल आणि दोन दिवसात अहवाल सादर करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - #SidNaaz: एका फायरब्रँड लव्ह स्टोरीचा काळीज पिळवटणारा अंत