मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार मलबार हिल पोलिस ठाण्यात दाखल केली असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या आरोपानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना अवैधरित्या शंभर कोटी रुपये दर महिन्याला गोळा करण्याचे सांगितले होते. हा फार मोठा गुन्हा असून त्यासंदर्भात तात्काळ पोलिसांनी लक्ष घालून याचा तपास करावा आणि तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जयश्री पाटील यांनी केली आहे. 120 बी, (क्रिमिनल कॉन्स्पिरेन्सि ) आणि भ्रष्टाचार अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आपल्या तक्रारीत जयश्री पाटील यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा -
गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे सहित जे कोणी या गुन्ह्यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी जयश्री पाटील यांनी केली. तसेच आपण राज्यपालांकडे देखील ही तक्रार करणार असल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले. यानंतरही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही तर जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा - परमबीर सिंग यांचे पत्र लक्ष विचलित करणारे; मात्र गृहमंत्री बदलणार नाही - जयंत पाटील