मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये नवीन कोरोनाचा प्रकार आढळून आला आहे. त्यासाठी इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ३० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
संपर्कात आलेले पॉझिटिव्ह -
मुंबईत मार्चमध्ये दाखल झालेला कोरोना आटोक्यात येत असतानाच आता ब्रिटममधील नव्या संसर्गाचा प्रसार होऊ लागला आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत २६२३ प्रवाशी दाखल झाले. त्यापैकी आतापर्यंत २५२१ प्रवाशांचा शोध लागला आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत १४१७ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये एकूण ३० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या २९ रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत १५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. या पंधरा जणांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे ब्रिटिश कोरोना चाचणीसाठी पाठवले असून येत्या एक-दोन दिवसांत त्यांचा अहवाल येईल अशी माहिती पालिका मुख्य आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
नमुने एनआयव्हीकडे -
नव्या कोरोनाच्या तपासणीसाठी संबंधितांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले होते. ५ जानेवारीला ३ तर ६ जानेवारीला २ रुग्णांना ब्रिटिश कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एकाला डिस्चार्ज दिला असून दुसऱ्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असे गोमारे यांनी सांगितले. इंग्लंडमधून गेल्या महिनाभरात परतलेल्या ७४५ प्रवाशांनी २८ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर २५०३ प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा - IND vs AUS : टीम इंडियाची घोषणा; रोहितचे पुनरागमन, नवदीप सैनीचे पदार्पण