मुंबई - मागील वर्षी सुरू झालेले कोरोना संकट अजूनही संपलेले नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, अनेक जण बेरोजगार झाले आहेत. कोरोना संकटात शाळा ऑनलाईन सुरू आहेत, मात्र काही शाळांनी विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांची फी माफ करावी असे आदेशच सरकारने काढावेत अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी केली आहे. नांदगावकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी, बस फी यावर्षी सर्वच शाळांनी माफ करावी. किंबहुना शिक्षण मंत्र्यानी सरसकट तसे आदेशच दयावेत. छत्तीसगड येथील खासगी शाळांनी मनाचा मोठेपणा दाखवत तसा निर्णय घेतला आहे. असे ट्विट
नांदगावकर यांनी केले आहे.
यापूर्वीही केली होती फी माफ करण्याची मागणी
राज्यात कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार बुडाले असून, अनेकजण बेरोजगार झाले आहेत. परंतु शाळा ऑनलाईन सुरू असल्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची फी वसुली सुरु केली आहे. शाळांची फी भरली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आले नाहीत. तसेच अनेक पालकांना शाळांकडून त्रास दिला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे यापुर्वीही शाळांची फी माफ करण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - जातपंचायतकडून 5 कुटुंबांना वाळीत टाकण्याचा प्रकार, नंदीवाले समाजातील घटना