मुंबई - गणेशोत्सवाची जोरदार तयारी आता अनेक घरांमध्ये सुरू झाली आहे. तेव्हा गोडधोडाचे पदार्थ बनवण्यासाठीची खरेदी सुरू झाली असेल किंवा करत असाल तर सावधान. कारण सणासुदीच्या काळाचा फायदा घेत भेसळखोर सक्रिय झाले आहेत. अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे.
बुधवारी घाटकोपर, असल्फा येथून एफडीएने अडीच लाखांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे तेल वा सणासुदीसाठी खवा-मावा, मिठाई, रवा, बेसन, डाळी, तेल-तूप अशी खरेदी करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
गणेशोत्सवापासून मोठ्या उत्सवांना म्हणजेच नवरात्र, दसरा, दिवाळी आणि ख्रिसमससारख्या सणांना सुरूवात होते. तर सण आणि गोडाधोडाचे पदार्थ हे एक समीकरण असते. त्यामुळे तेल-तूप, खवा-मावा, मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेसन, रवा, डाळी अशा अनेक कच्चा मालाची मागणी प्रचंड वाढते. तर या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी भेसळखोर या काळात सक्रिय होतात. त्यामुळे भेसळ प्रचंड प्रमाणात वाढते. याअनुषंगाने एफडीएला ही या काळात सतर्क रहावे लागते. त्यासाठीच दरवर्षी गणेशोत्सवापासून नववर्षापर्यंत एफडीएची विशेष मोहीम सुरू होते. या काळात एफडीए किराणा मालाची दुकाने, गोदाम, डेअरी, मिठाईची दुकाने यावर लक्ष ठेवतात. त्यानुसार या विशेष मोहीमेला सुरवात झाली असून कालच, गुरुवारी एफडीएने अडीच लाखांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे.
मे. श्री ओम सुर्या एंटरप्रायझेस, असल्फा, घाटकोपर येथून हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती शशिकांत केकारे, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली आहे. 2321.1 किलो तेलाचा हा साठा असून त्याची किंमत 2 लाख 58 हजार 030 रुपये इतकी आहे. या उत्पादकाकडून वापरलेल्या कॅन अर्थात डब्याचा पुनर्वापर करत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. नियमानुसार नवीन डब्यामध्येच तेल भरून सीलबंद करणे गरजेचे असते. अशावेळी अस्वच्छ, वापरलेल्या डब्यात तेल भरले जात असल्याचे दिसून आले. असे तेल खाण्यायोग्य नसते. त्यामुळे या तेलाचा साठा जप्त करत त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती केकारे यांनी दिली आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.