मुंबई - वांद्रे-वरळी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अखेर 26 जानेवारीपासून 100 टक्के फास्टॅगची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्ही मार्गावर फास्टॅग ही अत्याधुनिक टोल वसुलीसाठीची इलेक्ट्रॉनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनांना फास्टॅग लावण्याची गरज आहे. मात्र, काही दिवस काही हायब्रीड लेनमधून फास्टॅग नसलेल्याना प्रवास करता येणार आहे. या नंतर लगेचच अशा वाहनांना नजीकच्या स्टॉलवरून फास्टॅग खरेदी करावा लागणार आहे, अशी माहिती विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा यांनी दिली आहे.
फास्टॅग लेनमध्ये घुसल्यास दुप्पट टोल -
उद्यापासून सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवरील फास्टॅग लेन मधून विनाफास्टॅग प्रवास करणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. या लेनमधून विनाफास्टॅग गेल्यास दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टॅग नसलेल्यासाठी काही हायब्रीड लेन तयार करण्यात आल्या आहेत. या लेन वरून फास्टॅग नसलेल्याना जात येणार असून त्यांना रोख रक्कम भरता येणार आहे. पुढे जाऊन नजीकच्या स्टॉलवरून त्या वाहनाचालकांना फास्टॅग विकत घ्यावा लागेल. ही हायब्रीड लेन काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत वाहनचालकांना फास्टॅग लावूनच घ्यावा लागणार आहे.
मार्चपासून इतर टोलनाक्यावर फास्टॅग -
केंद्र सरकारने फास्टॅग बंधनकारक करत याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 26 जानेवारीपासून राज्यातील दोन मुख्य मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. लवकरच उर्वरित सर्व रस्त्यावरील टोलनाक्यावर मार्चपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.