मुंबई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भारतातही संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. अनेक उद्योग क्षेत्र या लॉकडाऊनमुळे प्रभावित होत असताना जागरूक शेतकऱ्यांनी मात्र 'झूम' या मीटिंग ॲपचा वापर करून शेतीच्या भविष्याची उभारणी सुरू केली आहे. 'किसान'चे संस्थापक निरंजन देशपांडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला 'सगुणा बाग कृषी पर्यटन'चे प्रवर्तक आणि एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी चालना दिली आहे.
दररोज सकाळी 11 वाजता यासंदर्भात राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडते. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचा ऊहापोह केला जातो. कृषी ज्ञानाचे हस्तांतरण केले जाते. कोरोना संकटामुळे आगामी खरीप हंगाम अडचणीचा असणार आहे. कृषी निविष्ठांची उपलब्धता कशी करायची, याबाबतही शेतकऱ्यांच्या या बैठकीमध्ये नियोजन करण्यात येते. याबाबत बोलताना 'सगुणा बाग'चे चंद्रशेखर भडसावळे यांनी, 'देशापुढे संकट आहे. परंतु देशाचा अन्नदाता शेतकरी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढील संकटाला संधीत रूपांतर करण्यासाठी आपण कटिबद्ध असायला पाहिजे,' असे म्हटले आहे.
'कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये पुढील काळात अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला काटकसर करावी लागणार आहे. आम्ही तयार केलेले एसआरटी तंत्रज्ञान हे काटकसर करणारे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता आणि उत्पन्न वाढीसाठी, अशा प्रकारचे शेती तंत्रज्ञान निश्चितपणे उपयुक्त ठरेल,' असे या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा... चिमुकल्यांना घातली केमिकलने अंघोळ; अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप!
रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील शेतकरी परशुराम आगवले यांनी एसआरटी तंत्रज्ञानाने आपल्या दोन एकर शेतामध्ये भाजीपाला उत्पादन केले आहे. लॉकडाऊनमुळे तसेच संचारबंदी असल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीपर्यंत शेतमाल नेणे अशक्य झाले आहे. ऑनलाइन बैठकीमध्ये सहभागी होताना परशुराम आगवले यांनी, 'कोरोनामुळे मोठे संकट येणार, याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. परंतु, अशा संकटकाळातही पुढील एक वर्ष तग धरून राहण्याची ताकद आम्हाला एसआरटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळाली आहे. भाजीपाला उत्पादनात एसआरटी तंत्रज्ञान वापरल्यामुळे मुळातच उत्पादन खर्च कमालीचा घटला आहे. बाजारात सध्या शेतमालाचा तुटवडा आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक थेट आमच्या शेतामध्ये येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आम्ही ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना ठराविक अंतरावर उभे करतो आणि त्यांना आवश्यक असलेल्या शेतमाल जाग्यावर काढणी करून देतो' असे आगवले यांनी सांगितले आहे.
'पैशाचा व्यवहार देखील दूर अंतरावरुन केला जातो आहे. शेतावर ठेवलेल्या डब्यामध्ये ग्राहक आणि व्यापारी पैसे टाकतात. पैशाच्या माध्यमातून विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आम्ही पैशांना 24 तास हातदेखील लावत नाही. निर्जंतुकीकरण केल्यानंतर हा पैसा आम्ही वापरतो,' असेही आगवले यांनी ऑनलाईन बैठकीत सांगितले.
हेही वाचा... चिमुकल्यांना घातली केमिकलने अंघोळ; अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप!
रायगडमधीलच खोपोली येथील शेतकरी रसिका फाटक यांना बाजारभावाची अडचण आहे. मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्पादित होऊनही व्यापारी ठराविक प्रमाणातच शेतमाल खरेदी करत असल्याने शेतमाल तसाच राहु शकतो. यामुळे उत्पन्नाचा खर्चही आपल्याच डोक्यावर पडत असल्याची खंत रसिका फाटक यांनी या ऑनलाईन बैठकीत व्यक्त केली. ऑनलाइन बैठकीत सहभागी झालेल्या कृषी अधिकाऱ्यांनी यावर त्यांना उपाय सुचवत शासनाच्या वतीने थेट शेतमाल विक्रीसाठी परिवहन आणि कृषी विभागाकडून परवाने दिले जात असल्याचे सांगितले. तसेच ऑनलाइन बैठकीत सहभागी होत अनुराधा भडसावळे यांनी शेतमाल शिल्लक राहत असेल तर त्याचे निर्जलीकरण करून प्रक्रिया करावी, असा सल्ला दिला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट शहरी भागांमध्ये दिसत असेल, तरी आगामी काळात ग्रामीण भागात त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गाने याबाबत अधिक जागरुकता आणि दक्षता घेऊन शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. यावर या ऑनलाऊन बैठकीत एकमत झाले. एकंदरीतच कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामीण भागात शेतकरी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करत असल्याचे दिसत आहे.