मुंबई - डोसा हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वात लोकप्रिय 'स्ट्रीट फूड स्नॅक' आहे. तुम्हाला शहरातील प्रत्येक कोपऱ्यात डोसा स्टॉल सापडेल, जणू काही हा मुंबई शहरातील न्याहारीमधला प्रमुख खाद्य प्रकार बनला आहे. आपण सर्वांनी खूप वेळा डोसा खाल्ला असेल, पण "उडणारा डोसा" आपण यापूर्वी कधी खाल्ला आहे का? उडणारा डोसा हा मुंबईमधील काळबादेवी परिसरातील मंगलदास मार्केटमध्ये बघायला मिळतो.
श्री बालाजी डोसा फॅक्टरी म्हणून इथे एक डोसा बनवणारे दुकान आहे. आपल्या स्वादिष्ट डोसाच्या प्रकारांसाठी हे दुकान अतिशय प्रसिद्ध आहे. डोसा बनविणारा माणूस हवेत डोसा उडवून अगदी अनोख्या पद्धतीने डोसा बनवतो आणि दुसरा मुलगा तो हवेत उडणारा डोसा प्लेटमध्ये पकडतो. संपूर्ण डोसा तयार करणे आणि सर्व्ह करताना पाहणे हा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे लोक या दुकानावर नेहमी गर्दी करत असतात आणि हा उडणारा डोसा बघण्यासाठी खासकरून खूप लांबून लोक येतात.
ज्युनिअर रजनिकांत
हा "उडवणारा डोसा" बनवणाऱ्या मुलाचे नाव शिवा शर्मा असे आहे. त्याच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्याने सांगितले की, टाळेबंदी संपल्यानंतर मी हा डोसा उडवण्याचे काम करू लागलो. पूर्वी कमी उंचीवर डोसा उडवायचो, आता सराव करून मला मला हे जमले. लोकांना पण काही तरी चांगले वाटते याबद्दल. मला लोक म्हणतात की, तू ज्युनिअर रजनिकांत आहेस. कारण, रजनी सर आपल्या चित्रपटांमध्ये जसे अनेक स्टाईल करतात, तशीच काहीशी स्टाईल मी आपल्या कामात करतो, त्यामुळे लोक पण खूश होतात आणि मला सांगतात, मला डोसा उडवून पाहिजे. मग मला अजून उत्साह येतो. त्यामुळे मला माझे काम खूप आवडते आणि मी मूळचा उत्तर भारतीय आहे. मला डोसा कसा बनवायचा हे एका दक्षिण भारतीय कारागिरने शिकवले. त्यानंतर मला हे सगळे काही जमले.
डोसा उडवणारा शिव शर्मा आपल्याशी दिलखुलासपणे बोलला. आपणही फेसबुकवर किंवा युट्युबवर उडणाऱ्या डोशाचा व्हायरल व्हिडिओ पहिला असेल. हा व्हिडिओ मुंबईतील असून खूप उत्तम प्रकारचे डोसे हा शिव शर्मा बनवतो.