मुंबई - दादर नायगाव येथील पोलीस वसाहत धोकादायक असल्याने या इमारतीत पोलीस कुटुंबांना नोटीसा बजावण्यात आले आहे. मात्र, इमारत खाली करण्यास पोलीस कुटुंबांचा विरोध आहे. पोलिसांचे कुटुंबियांनी आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले आहे.
'घर सोडून आम्ही जायचे कुठे' -
दरम्यान, तातडीने घर खाली करण्यास सांगितल्याने पोलिसांच्या कुटुंबाकडून निषेध केला जात आहे. घर सोडून आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. राजकीय नेत्यांकडून काहीतरी मदत मिळावी, या अपेक्षाने आज पोलीस पत्नीनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचत त्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले.
काय आहे प्रकरण -
नायगाव पोलीस वसाहतींमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अनेक प्रश्न या कुटुंबास समोर उभी राहिली आहेत. मुलांचे शिक्षण आणि अनेक गोष्टी असल्यामुळे दहा दिवसांमध्ये घर खाली कसे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईमध्ये कमी दरात पटकन दुसरी जागा उपलब्ध होणे शक्य नाही. त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बद्दल ही कोण समोर येऊन सांगत नाही. त्यामुळे या कुटुंबांमध्ये संभ्रम आहे. त्यांची दुसरीकडे जवळपासच व्यवस्था केली पाहिजे, असे तडकाफडकी त्यांना घराबाहेर काढणे योग्य नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील याविषयी संबंधित लोकांशी बोलू, असे आश्वासन दिले आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.