मुंबई - विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र सर्व नेते हे संघटनात्मक कामासाठी दिल्लीत आले असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आल आहे.
खासदारांची दिल्लीत आज बैठक
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले खासदारांची दिल्लीत आज बैठक होणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ही आज संध्याकाळी बैठक पार पडेल. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेले मंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली असल्याचं भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येते आहे. मात्र या बैठकीनंतर महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही एक बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे?
गेल्या आठवडाभरापासून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणतीही चर्चा दिल्लीत होणार नाही. प्रदेशाध्यक्षपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ आपण पूर्ण करू असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूकबाबत चर्चा
काही महिन्यानंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची बनवलेली आहे. शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीतीवर आज गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.