मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल- मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाद देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपला अर्ज भरता आला नाही, त्यांना २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपला अर्ज विनाविलंबशुल्का भरता येणार आहे.
शिक्षण मंडळाकडून दहावीच्या लेखी परीक्षेसाठी २५ जानेवारीपर्यंत ऑलनाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु मुंबईसह, पुणे आदी शहरातील अनेक शाळा अजूनही पूर्णपणे सुरू न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. तर अनेक ठिकाणी अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शिक्षण मंडळाकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
असा भरावा लागणार अर्ज
मंगळवारी, २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर विलंबशुल्कासह ३ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर राज्यात जे विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसतात, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे, त्यामुळे या कालावधीत या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरू नये असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.