मुंबई - कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता शाळा कधी सुरू होतील याचे उत्तर तुर्तास तरी कोणाकडे नाही. परंतु यानिमित्ताने आत्तापर्यंत धडे आणि पुस्तकांवर आधारित असलेल्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची एक नामी संधी सरकारला मिळाल्याचे मत सिस्कॉम संस्थेच्या संचालिका व शिक्षण सुधारणा प्रमुख वैशाली बाफना यांनी व्यक्त केले आहे.
जगभरामध्ये शिक्षण पद्धतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. आपल्याकडे मात्र हे बदल अजूनही स्वीकारले गेले नव्हते. मात्र आता कोरोनाने एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची संधी आली आहे. विज्ञान आणि गणित विषय सोडून अनेक विषयांना स्टोरी रायटिंग, प्रकल्प, चित्रमय गोष्टीतून निबंध लेखन, पत्रे आदी विविध कौशल्य विषयक स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आकलन आणि लेखन कौशल्य वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे नवीन प्रकारचा अभ्यासक्रम तयार करता येऊ शकतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची माहिती येते, त्याचा एक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. त्यावर उपाययोजना आणि सुरक्षिततेसाठी कोणत्या पद्धती आहेत. त्याची माहिती दिली, तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची कल्पकताही वाढण्यास मदत होणार आहे. असे विविध उपक्रम राबवले तर विद्यार्थ्यांचे त्यातून कौशल्य वाढेल आणि कोणतेही नुकसान होणार नाही, असेही बाफना म्हणाल्या.
नववी हा दहावीचा पाया असतो. दहावीच्या गुणवत्तेवरच आपली पुढील शिक्षण पद्धती ठरलेली असते. त्यामुळे दहावीच्या अभ्यासक्रमात भाषेवर भर देताना नियमित शाळा घेण्याचीही गरज आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन पहिली ते चौथीपर्यंत शाळा या दरम्यान घेऊच नये. त्यापेक्षा या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात टाकण्यात यावे, अशा अनेक सूचना वैशाली बाफना यांनी केल्या आहेत.
इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दलाल म्हणतात, की आम्हाला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती असलेले आणि त्याचे ज्ञान असलेले शिक्षक आता अधिकाधिक लागतील. ऑनलाईन शिक्षणाचा वापर शिकवण्यासाठी करता येईल, मात्र त्यातून मुलांना येणारी निराशा कशी घालवायची हा एक प्रश्न निर्माण होणार आहे. यापुढे प्रत्येक वर्गात कमीत कमी विद्यार्थी ठेवणे आवश्यक असणार असल्याने अधिक प्रवेश करणेसुद्धा अनेक शाळांना जमणार नाही. त्यामुळे एकूणच शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल होतील आणि ते बदल अंगवळणी पडायला वेळ लागेल, असे दलाल म्हणाले.
कारोनामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम आणि त्याचे पर्याय समोर आले असले, तरी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना हे शक्य होईलच असे नाही. यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजे. त्या नव्या स्वरूपात आणि योग्य खबरदारी घेऊन सुरू झाल्या पाहिजे. यापुढे सोशल डिस्टन्सचा विषय हा कायमच असणार आहे. आज विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. एकीकडे शाळा अडचणीत सापडलेल्या असताना त्यांचे वेतन देणेही शाळांना शक्य होणार नाही. यामुळे सरकारने यावर काहीतरी वेगळे पॅकेज देण्याची गरज असल्याचे मत संस्थाचालक शांताराम अगिवले यांनी व्यक्त केले.