मुंबई - नागपूर काँग्रेस अंतर्गत कलहामुळे ढवळून निघत आहे. माजी आमदार काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंत्री सुनील केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यानंतर केदार यांनी दिल्लीत जाऊन जेष्ठ नेत्यांची भेट घेतली. आता त्यापाठोपाठ आशिष देशमुख हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोनिया गांधींची भेट घेणार असून केदार यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याची माहिती डॉ. आशिष देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यात दुग्धविकास, पशुसंवर्धन आणि क्रिडा मंत्री सुनील केदार हे आरोपी आहेत. सध्या न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे. सुनील केदारांवर भष्ट्राचाराचे आरोप असून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, यामागणीचे पत्र आशिष देशमुख यांनी नुकतचं मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीची पुन्ही एकदा चर्चा झाली. तसेच लगेच मंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. आता आज आशिष देशमुख दिल्लीत दाखल झाले असून ते सोनिया गांधींची भेट घेणार आहे. यासंदर्भात आशिष देशमुख म्हणाले, "सुनील केदारांमुळे हजारो लोकांच्या ठेवी अडचणीत आल्या आणि सहकारी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला. या घोटाळ्याची माहिती सोनिया गांधींना देऊन सुनील केदारांच्या हकालपट्टीची मागणी करणार," असे ते म्हणाले. तसेच सोनिया गांधींनी कधीही भष्ट्राचाराला थारा दिला नाही, त्यामुळे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगून केदारांची हकालपट्टी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.