मुंबई - पोलिसांना माहिती दिल्याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती केले जात नसल्याचा प्रकार 'ईटीव्ही भारत'ने उघड केला होता. या प्रकरणाची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सायन रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
एखादा अपघात, दुर्घटना, खून झाल्यास अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यास जखमींना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. याबाबतची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असते. मात्र, कायद्यानुसार कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तीला पोलिसांची परवानगी नसतानाही रुग्णालयात प्राथमिक उपचार देणे आवश्यक आहे. अपघातग्रस्तांचा जीव वाचवणे ही कायद्याची प्राथमिकता आहे. याची अंमलबजावणी न करता रुग्णालय प्रशासनाकडून घटनेची माहिती पोलिसांना दिल्याखेरीज रुग्णांना भरती करून घेण्यात येत नव्हते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
हेही वाचा पालिका रुग्णालयात उपचार करण्याआधी पोलिसांना द्यावी लागतेय माहिती; नागरिकांमध्ये संताप
पालिका रुग्णालयात उपचार करण्याआधी पोलिसांना माहिती द्यावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप होता. यासंबंधी बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. त्याची गंभीर दखल पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी रुग्णालयाकडून खुलासा मागवला आहे.
प्रशासनाचा लाल फितीचा कारभार
कोणत्याही अपघाताच्या घटनेनंतर पोलीस जबाब, गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करतात. रुग्णाला भरती करण्यापूर्वी रुग्णालयातील पोलिसांकडे नोंद करावी लागते. पोलिसांनी नोंद केल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून जबाब नोंदवण्यास सांगण्यात येते. यामुळे आधी रुग्णाला उपचार करायचे की पोलिसांना जाऊन जबाब द्यायचा, अशा द्विधा परिस्थितीत नातेवाईक सापडले होते. या प्रकारामुळे नातेवाईक त्रस्त झाले असून, त्यांच्यात संतापाची भावना होती.