मुंबई - 'वडाळ्यातील बीपीटीच्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी कोणताही खेळ सुरू नाही. रुग्णांना व्यवस्थितपणे हाताळले जात आहे' असे म्हणत बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी रुग्णालय हॉटस्पॉट ठरत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप फेटाळून लावला आहे. तर रुग्णालयाचे सीएमओ डॉ. आण्णा दुराई यांनी देखील हे आरोप नाकारत काही कर्मचारी जाणीवपूर्वक रुग्णालयाची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, कर्मचारी वर्ग अद्यापही 'आपण जे वास्तव सांगत आहे. तेच खरे असून लवकर याकडे लक्ष दिले गेले नाही तर हाहाकार माजेल' यावर ठाम आहेत.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : रुग्णालयच बनलंय कोरोनाचे हॉटस्पॉट ? बीपीटी रुग्णालयातील 250 कर्मचाऱ्यांच्या जीवाशी होतोय खेळ !
कोविड-19 म्हणून जाहीर करण्यात आलेल्या बीपीटीच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, याचे वृत्त आज (शनिवार) सकाळी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केले होते. यानंतर संजय भाटिया यांनी या वृत्ताची दखल घेत प्रतिक्रिया देताना, 'कुणी एक कर्मचारी जाणीवपूर्वक रुग्णालयाची बदनामी करत आहे. रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा असून कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे' असे म्हटले होते. तसेच 'सध्या रुग्णालयात 10 हजार पीपीई किट असून इतर ही साधने आहेत' असे रुग्णालयाचे सीएमओ डॉ. आण्णा दुराई यांनी सांगितले आहे. मात्र, रुग्णालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार गेली असल्याचेही भाटिया यांनी मान्य केले आहे. परंतु ही तक्रारच खोटी असल्याचे भाटीया यांनी सांगितले.
हेही वाचा.... ...तर जहाजातही क्वारंटाइन कक्ष, बीपीटीच्या तीन इमारतीही एक हजार बेडसह उपलब्ध
दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत बोलताना कर्मचाऱ्यांनी मात्र, 'रुग्णालय व्यवस्थापन खोटे बोलत असून त्यांच्या या चुकीचा फटका आम्हाला बसणार असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली आहे'. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली असून आता तेच काही तरी करतीलल अशी आशा येथील कर्मचाऱ्यांना आहे. त्याचवेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे देखील ही तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही. त्यांनीही लक्ष घालत आम्हाला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे केली आहे.