मुंबई - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा केल्या असल्या तरीसुद्धा विरोधकांनी हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प असं सांगितलं आहे. याविषयी भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
प्रश्न - या अर्थसंकल्पावर तुमची पहिली प्रतिक्रिया?
उत्तर - अतिशय बोगस, आभासी, अर्थहीन आकडे असलेला असा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. वास्तविक अर्थमंत्री अजित दादा पवार व राज्य अर्थमंत्री शंभूराजे देसाई यांनी जनतेला फसविण्याचे काम केलेलं आहे. हा साडेतीन जिल्ह्याचा अर्थसंकल्प आहे. स्वतःच्या पक्षातील जिल्ह्यातील आमदारांना सुद्धा यांनी फसविण्याचे काम केलेलं आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कुठेही उल्लेख नाही. ओबीसी, मराठा समाजाला निधी दिलेला नाही. देवेंद्रजींनी राबवलेल्या योजना पुन्हा राबवण्याच काम या अर्थसंकल्पातून केलं गेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये मेट्रोचा सुद्धा कुठेही उल्लेख नाही. शेतकरी, सामान्य जनता यांच्या विरोधात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे.
प्रश्न - पेट्रोल-डिझेल संदर्भात सामान्य जनतेला अपेक्षा होती की त्याचे कर कमी केले जातील? नाना पटोले यांनी याबाबत सरकारला मागे घरचा आहेर दिला होता?
उत्तर - नाना कधी कधी चांगल बोलतात. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ओबीसी, मराठा, छत्रपती यांना या अर्थसंकल्पामध्ये वाव नाही आहे.
प्रश्न - करोनामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांचा निधी देण्याचे सांगण्यात आलं होतं, पण तो निधी दिलेला आहे का या बाबत स्पष्टता नाही?
उत्तर - कोरोना मध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यासाठी त्यांच्या वारसांना 50 हजार रुपये निधी देण्याचे सरकारने ठरवलं होतं. त्यासाठी कित्येक कोटी रुपयांच वाटपही करण्यात आलेलं आहे. परंतु हे पैसे कुठे गेले कोणाच्या खात्यात गेले? कशे गेले? त्यांना भेटले की नाहीत? याचा कसल्याही पद्धतीचा उल्लेख जो आहे, तो या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.
प्रश्न - बुलेट ट्रेन संदर्भामध्ये मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन चा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे?
उत्तर - छत्रपतींच्या महाराष्ट्रात यांना प्रगती करायची नाही, पण निजामांच्या हैदराबाद मध्ये त्यांना प्रगती करायची आहे. म्हणून मुंबई- गुजरात बुलेट ट्रेन ला विरोध करायचा व दुसरीकडे मुंबई - हैदराबाद या बुलेट ट्रेन विषयी चर्चा करायची असं फसव सरकार आहे.
प्रश्न - शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये काय आहे?
उत्तर - शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीच करण्यात आलेलं नाही. शेतकरी गरीब राहिला पाहिजे तरी चालेल, परंतु बिल्डरांची तळी उचलण्याचं काम या सरकारने केल आहे.